पालिका प्रशासन : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) मुंबई येथील राज्य मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे संस्थापक आणि प्रकल्पग्रस्तांचे खंदे नेते दि.बा. पाटील यांची तस्वीर नसल्याने पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे. दि.बा. पाटील यांनी शेतकरी-कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्त जनतेसाठी आयुष्यभर दिलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या अतुलनीय नेतृत्वाचा हा अवमान असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दि.बा. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आधारस्तंभ होते. पनवेल पालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द थक्क करणारी होती. सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी त्यांनी अथक लढा दिला. महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात ११ महिन्यांचा कारावास भोगला, पोलिसांचा लाठीमार सहन केला आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या करारी आवाजाने आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात घाम फोडला. “दिबा उभे राहिले की सत्ताधारी गप्प,” अशी त्यांची ख्याती होती.
दि.बा. पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय विरोधी पक्ष म्हणून उभे केले. त्यांच्या एका हाकेला लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. असे असताना, पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांची तस्वीर नसणे हा केवळ अपमानच नव्हे, तर पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाने आपल्या मुळांपासून दुरावल्याचा पुरावा आहे, अशी टीका होत आहे.
“दि.बा. पाटील यांनी पक्षाला रक्त-पाणी करून मोठे केले. त्यांच्या तस्विरीला कार्यालयात स्थान नाही, हे दर्शवते की सध्याचे नेते आपल्या इतिहासाला विसरले आहेत. हा केवळ दि.बा. पाटलांचा नव्हे, तर प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी-कष्टकऱ्यांचा अपमान आहे.” स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत नाराजी पसरली आहे. “शेकापचे आजचे नेते दि.बा. पाटलांच्या कर्तृत्वाला जाणीवपूर्वक झाकोळत आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पक्षाच्या कार्यालयात दि.बा. पाटलांच्या तस्विरीऐवजी इतर नेत्यांच्या तसबिरी लावण्यात आल्याचे दिसून येते, ज्यामुळे पक्षाच्या प्राधान्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि.बा. पाटील यांनी नवी मुंबईच्या विकासात आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान पाहता, त्यांच्या स्मृतीचा असा अवमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खटकत आहे.
या घटनेमुळे शेतकरी कामगार पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्ष आपल्या गौरवशाली इतिहासाला आणि दि.बा. पाटील यांच्या वारसाला खऱ्या अर्थाने जपणार आहे की त्यांचे योगदान विसरण्याच्या मार्गावर आहे? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने तातडीने याबाबत खुलासा करून दि.बा. पाटलांच्या तस्विरीला योग्य स्थान द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

