पालिका प्रशासन/सुदिप घोलप : विधानसभा निवडणुकीत 91,475 मतदारांनी नाकारलेल्या एका उमेदवाराच्या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याच्या योजनेमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अडगळीत पडलेल्या ओलसर जमिनीवर ही प्रकल्प उभारण्याची घाई केवळ 10% कमाईसाठी असल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.
सूत्रांनुसार, हा उमेदवार अडगळीत असलेल्या आणि सिडकोमुक्त अश्या ओलसर जमिनीवर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचा आग्रह धरत आहे. मात्र, या प्रकल्पामागे सामाजिक हितापेक्षा आर्थिक लाभ आणि कमिशनच्या स्वरूपात 10% कमाई मिळवण्याचा हेतू असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. या योजनेमुळे उमेदवाराच्या राजकीय आणि सामाजिक विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या योजनेला निस्वार्थ हेतू असेल, तर बेलापूर सेक्टर 15 मधील क्रोमा शोरूमसमोरील सिडकोच्या मालकीचा भूखंड मागावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली आहे. हा भूखंड शहराच्या मध्यवर्ती भागात असून, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थेसाठी योग्य आहे. यामुळे प्रकल्पाची पारदर्शकता आणि उपयुक्तता वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. मात्र, या भूखंडाची मागणी करण्यास उमेदवार तयार नसल्याने संशयाला अधिक बळ मिळत आहे.
या प्रकरणाने नवी मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा प्रकल्पांना प्रोत्साहन द्यावे, परंतु त्यामागील हेतू पारदर्शक असावा. तर काहींनी थेट आरोप केला आहे की, निवडणुकीत काहीश्या मतांनी जिंकलेला हा उमेदवार आता आर्थिक लाभासाठी सामाजिक प्रकल्पांचा बुरखा पांघरत आहे.
यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सामाजिक प्रकल्पांमागील हेतूंवर प्रकाश टाकला आहे. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या नावाखाली होणारी ही “10% कमाई” खरी ठरते की हा केवळ गैरसमज आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईल. जर खरेच निस्वार्थपणे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारायचे असेल, तर बेलापूर सेक्टर 15 येथील क्रोमा शोरूमसमोरील सिडकोच्या मालकीच्या भूखंडाची मागणी करावी, असा सल्लाही काही जणांनी दिला आहे.
हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, परंतु त्यानंतरही ते पूर्णतः कार्यान्वित होईल याची खात्री नाही. महापालिकेच्या प्राथमिक संदर्भ रुग्णालयांची दुरवस्था पाहता, व्यवस्थापन आणि देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. यशस्वी कार्यान्वयनासाठी पारदर्शक नियोजन, पुरेसा निधी, आणि कार्यक्षम प्रशासन आवश्यक आहे. त्यामुळे उभारलेल्या इमारतीत गोरगरीब गरजूंना उपचार सेवा सुविधा मिळो किंवा न मिळो, तरी उभारलेल्या इमारतीपासून कमाई मात्र नक्की झालेली असेल.

