पालिका प्रशासन : पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी 28 रोजी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मुलींच्या बालगृहाबाहेरील फुटपाथवर एका बास्केटमध्ये नवजात मुलगी आढळून आली. या बाळासोबत सापडलेल्या इंग्रजी चिठ्ठीत पालकांनी आर्थिक आणि मानसिक असमर्थतेचे कारण देत बाळाला सोडण्यामागील विवशता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पालकांचा शोध सुरू केला आहे.
सकाळी स्थानिक नागरिकांना बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
बाळासोबत सापडलेल्या चिठ्ठीत पालकांनी लिहिले आहे, “प्रिय सर/मॅडम, आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका. आम्हाला जे सहन करावे लागत आहे, ते या बाळाच्या नशिबी येऊ नये. तिची काळजी घ्या. आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ.” या चिठ्ठीने या घटनेला भावनिक वळण मिळाले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली आहे. “ही अत्यंत दुखद घटना आहे. बाळाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मुलीच्या भवितव्याच्या अनुषंगाने योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली आहे. “ही अत्यंत दुखद घटना आहे. बाळाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.
पनवेल शहर पोलिसांनी अशा प्रकारे बाळाला सोडणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले. बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पालकांच्या विवशतेबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी अशा कृत्याचा निषेध केला आहे. या घटनेने समाजातील आर्थिक आणि सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. बाळाच्या भवितव्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

