पालिका प्रशासन : सिवूडस सेक्टर 48 येथील, 2021 पासून बंद पडलेल्या पाळणाघराच्या इमारतीबाबत माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी वनमंत्री व लोकनेते गणेश नाईक यांच्या जनता दरबारात विषय मांडला. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर ठामपणे बोट ठेवल्याने नाईक यांनी तात्काळ पाळणाघर सुरू करण्याचे आदेश महापालिकेला दिले. यामुळे सिवुड्स परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशाल डोळस यांनी जनता दरबारात ठोस पुराव्यांसह पाळणाघराच्या इमारतीकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाची पोलखोल केली. नवी मुंबई महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून 2021 मध्ये ही इमारत बांधली, परंतु समाज विकास विभागाच्या निष्क्रियतेमुळे ती धूळखात पडली होती. डोळस यांनी आयुक्त आणि समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत शासनाच्या ICDS विभागाला फक्त 12,000 रुपये भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार केल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. यामुळे पाळणाघराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
विशाल डोळस यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर बोट ठेवत, सदर इमारतीत फक्त अंगणवाडी सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे उघड केले. शासनाकडून पाळणाघर सुरू करण्यासाठी SOP आले नसल्याने सद्यस्थितीत पाळणाघर चालविणे शक्य नसल्याचे ICDSच्या प्रमुख ज्योती पाटील ह्यांनी सांगितले आहे. “लाखो रुपये खर्चून बांधलेली ही इमारत पाळणाघरासाठीच होती. जर याठिकाणी फक्त अंगणवाडी सुरू झाली, तर पालिकेचा खर्च हा जनतेच्या पैशाचा अपव्यय ठरेल,” असे डोळस यांनी ठणकावले. त्यांच्या या परखड भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
विशाल डोळस यांनी पुराव्यांसह मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत मंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. समाज विकास विभागाचे अधिकारी किसनराव पालांडे यांना तात्काळ पाळणाघर सुरू करण्याचे आदेश देत, नाईक यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेला चाप लावला. “वर्षानुवर्षे ही इमारत बंद पडली आहे. आता कोणतीही टाळाटाळ चालणार नाही. पाळणाघर तात्काळ सुरू करा,” असे स्पष्ट शब्दात त्यांनी बजावले.
विशाल डोळस यांच्या या पाठपुराव्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विश्वासार्हतेत मोठी भर पडली आहे. सिवुड्स परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून, त्यांना जनतेचा खरा आवाज म्हणून पाठबळ दिले आहे. “विशाल डोळस यांनी आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी हा प्रश्न लावून धरला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता आमच्या परिसरात पाळणाघर सुरू होईल,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
तर, मंत्री नाईक यांच्या आदेशानंतर आता समाज विकास विभागावर पाळणाघर तात्काळ सुरू करण्याची जबाबदारी आहे. विशाल डोळस यांनी यापुढेही या प्रश्नावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नवी मुंबईतील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, पालिकेच्या निष्क्रियतेला चपराक बसली आहे. सेक्टर 48 मधील पाळणाघर लवकरच सुरू होईल, अशी आशा नागरिकांना आहे. विशाल डोळस यांच्या पाठपुराव्यामुळे सिवुड्सच्या नागरिकांना लवकरच पाळणाघराची सुविधा मिळणार आहे, आणि यामुळे त्यांचे सामाजिक नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.

