1–2 minutes

पालिका प्रशासन : सीबीडी बेलापूरच्या सेक्टर-15 मधील काही हॉटेल मालक वाहतूक पोलिसांच्या सीबीडी शाखेला दरमहा दहा हजार रुपये देऊन, मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने ग्राहकांच्या गाड्या उभ्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, जो हॉटेल मालक ट्राफिक पोलिसांना दर महिना रक्कम अदा करणार नाही, अशा हॉटेलच्या समोरून ग्राहकांची वाहने टोविंग करून दंड आकरण्यात येतो. या गैरप्रकारामुळे वाहतूक पोलिस रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, परिणामी वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा धोका वाढला आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-15 मधील काही हॉटेल मालक ग्राहकांच्या गाड्या थेट मुख्य रस्त्यावर पार्क करतात, ज्यामुळे रस्त्याची एक बाजू पूर्णपणे अडवली जाते. यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी तीव्र वाहतूक कोंडी होते. “रस्त्यावर गाड्या उभ्या असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. अनेकदा अपघातही घडले आहेत,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या कोंडीमुळे वाहनांमधून होणारे प्रदूषण वाढले असून, प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये संताप आहे. “वाहतूक पोलिसांना पैसे दिले जातात, म्हणून ते कारवाई करत नाहीत. हा प्रकार थांबवला पाहिजे,” अशी मागणी होत आहे.

याबाबत वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत सीबीडी बेलापूरमधील वाहतूक कोंडी आणि संबंधित समस्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कारवाई अपेक्षित :

– हॉटेल मालकांवर कठोर कारवाई,

– मुख्य रस्त्यावरील बेकायदा पार्किंगवर नियंत्रण,

– वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचाराची चौकशी


Design a site like this with WordPress.com
Get started