2–3 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आष्टे गाव आणि परिसरातील ग्रामस्थ सातत्याने खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून वारंवार आणि न सांगता तासंतास विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे स्थानिक आमदार महेश बालदी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थ आता थेट मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्याकडे ही समस्या मांडण्याच्या तयारीत आहेत.

आष्टे गाव आणि परिसरात विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येने गेल्या काही महिन्यांपासून उग्र रूप धारण केले आहे. उन्हाळ्यात विद्युत पुरवठा नसल्याने ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. आता पावसाळ्यात तर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. दोन ते चार तास विद्युत पुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अंधारात वेळ काढणे ग्रामस्थांना असुरक्षित वाटते.

विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, महावितरणकडून “विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि इतर सामग्रीच्या देखभाल, दुरुस्ती किंवा बदलण्याच्या कामांसाठी पुरवठा खंडित करावा लागतो,” असे सांगण्यात आले. मात्र, अशा कामांपूर्वी स्थानिक नागरिकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना, महावितरणकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. ग्राहक संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन करत तासंतास पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आम्हाला किमान आधी कळवले तर आम्ही त्यानुसार नियोजन करू शकतो. पण महावितरणला ग्राहकांच्या सोयीशी काही देणे-घेणे नाही,” अशी तक्रार अष्टे ग्रामस्थांची आहे.

स्थानिक आमदारांवर नाराजी

या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आ. बालदी यांनी या “लहान-सहान” समस्यांकडे लक्ष देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “आमदार फक्त जेएनपीटी बंदराशी संबंधित मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करतात. आमच्या गावातील मूलभूत समस्यांकडे त्यांचे लक्षच नाही,” अशी खंत गावाकऱ्यांनी व्यक्त केली. महावितरण हा विभाग थेट राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने, या समस्येची जबाबदारी स्थानिक आमदारांवर आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कसळखंड ग्रुप ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीतील विद्युत पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी आता पुढील पावले उचलण्याचे ठरवले आहे. यासाठी ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही समस्या मांडणार आहेत. “आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत ही समस्या सहन करणार नाही. आम्हाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह विद्युत पुरवठा हवा आहे,” अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

उरण विधानसभा मतदारसंघातील आष्टे गाव आणि परिसरातील विद्युत पुरवठ्याची समस्या ही केवळ तांत्रिक बाब नसून, प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक नेतृत्वाच्या दुर्लक्षाचा परिपाक आहे. ग्रामस्थांच्या संतापातून आणि त्यांच्या पुढील कृती योजनांतून ही समस्या लवकरच मोठ्या स्तरावर चर्चिली जाण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि स्थानिक आमदार या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started