पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिवूडस सेक्टर-50 (जुने) येथील शाळा क्रमांक ९३ च्या प्रवेशद्वार आणि शाळा इमारतीदरम्यानच्या भागातील पेवर ब्लॉक खचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी तातडीने पेवर ब्लॉक काढून स्टँप काँक्रीट करण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी महानगरपालिकेच्या बेलापूर स्थापत्य विभागाकडे केली आहे.
खचलेल्या पेवर ब्लॉकमुळे विद्यार्थ्यांना अपघात होऊन जखमी होण्याची किंवा जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शाळा परिसर आणि प्रवेशद्वारादरम्यानच्या भागात त्वरित स्टँप काँक्रीट करावे, अशी विनंती डोळस यांनी महानगरपालिकेला केली आहे.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना करावी,” असे डोळस यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

