पालिका प्रशासन/सुदिप घोलप : एका को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सायबर सेक्युरिटी प्रणालीच्या उद्घाटनासाठी आलेल्या VIP मंत्री यांच्या ताफ्याच्या दौऱ्यामुळे वाशी सेक्टर-१७ मधील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. सदर VIP यांच्या ताफ्याला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी रहिवाशांच्या वाहनांना जबरदस्तीने खेळाच्या मैदानात पार्क करण्यास भाग पाडले. आणि ज्या नागरिकांनी नकार दिला त्या नागरिकांच्या वाहनांना टोविंग करून मैदानात नेण्यात आले. या मनमानी कारभारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, वाहतूक पोलिस आणि त्या VIP विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वाशी सेक्टर-१७ मधील रहिवासी आपल्या दैनंदिन कामांसाठी वाहनांचा वापर करतात. मात्र, अति महत्त्वाच्या व्यक्तीचा ताफा येणार असल्याच्या कारणास्तव पोलिसांनी जबरदस्तीने स्थानिक रहिवाशांना त्यांच्या बिल्डिंग खाली रस्त्यावर उभी असणारी वाहने जवळच्या खेळाच्या मैदानात पार्क करण्यासाठी सांगितले. तर, “अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असतील, तर आम्हाला का त्रास? पोलिसांना काही नियमच नाहीत का?” असा सवाल एका स्थानिक रहिवाश्याने उपस्थित केला.
या घटनेने नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) दौऱ्यांसाठी कोणतीही स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) नसल्याचे उघड झाले आहे. खेळाच्या मैदानात वाहने पार्क करण्यास भाग पाडणे हा प्रकार कितपत कायदेशीर आणि योग्य आहे, असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे. “मैदान हे खेळण्यासाठी आहे, गाड्या उभ्या करण्यासाठी नाही. पोलिसांनी आमच्या मुलांचं मैदानही हिरावून घेतलं,” अशी खंत रहिवाशाने व्यक्त केली.
या घटनेमुळे त्या अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या विरोधात जनमानसात नाराजी पसरत आहे. “नेत्यांच्या ताफ्यामुळे सामान्य माणसाला त्रास होतो. त्या VIPने याची दखल घ्यावी आणि पोलिसांना योग्य सूचना द्याव्यात,” अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे त्यांची प्रतिमा डागाळली असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तर, या घटनेने व्हीआयपी दौऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रहिवाशांनी आता प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आणि पारदर्शक नियमावलीची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.




