पालिका प्रशासन/नवी मुंबई: भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये पदे पैसे घेऊन विकली जात असल्याचा धक्कादायक आरोप पक्षाचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली असून, यामुळे भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये असा खुलासा केला आहे की, एका भ्रष्ट कंत्राटदाराला कंत्राटाच्या गैरव्यवहारांमध्ये राजकीय संरक्षण देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे सचिव पद तब्बल पाच लाख रुपये घेऊन देण्यात आले. या आरोपांमुळे भाजपामध्ये पदवाटपासाठी पैशांचा व्यवहार होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
यापूर्वीही राजकीय पक्षांवर निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पैशांचा गैरवापर होत असल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, आता पक्षातील पदे मिळवण्यासाठीही पैसे द्यावे लागत असल्याचा गंभीर प्रकार जाधव यांच्या पोस्टमुळे समोर आला आहे. या प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे. तर, जाधव यांच्या या खुलाशानंतर भाजपाकडून या आरोपांची सत्यता आणि त्याचे पडसाद येत्या काळात काय दिशा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

