पालिका प्रशासन/क्राईम न्युज : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील श्री साई हॉस्टेलमध्ये मंगळवारी 3 जून रोजी रात्रीच्या सुमारास दोन व्यक्तींमधील वाद विकोपाला गेल्याने रक्तरंजित हाणामारी झाली. यात हॉस्टेलचे मॅनेजर सुशांत पांडुरंग बचाटे (वय ३२) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात प्रज्योत आनकराव दोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत बचाटे हे श्री साई हॉस्टेल, प्रेमाबाला पाटील बिल्डिंग, सेक्टर २९, आग्रोळी गाव, सीबीडी बेलापूर येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये दैनंदिन कलेक्शनसाठी गेले असता, तिथे राहणारे निर्भय यादव आणि प्रज्योत टोळे यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू होती. प्रज्योत हा दारूच्या नशेत असल्याने चिडला होता आणि निभय याला शिवीगाळ करत मारहाण करत होता.
सुशांत यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रज्योत याने संतापात गुलाबी रंगाचे कटर उचलून सुशांत यांच्यावर हल्ला केला. यात सुशांत यांच्या डाव्या हाताला आणि पोटाला जखम झाली. रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
या घटनेनंतर सुशांत यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रज्योत दोळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाथ महादेव लोखंडे यांनी तपास सुरू केला आहे.

