पालिका प्रशासन : केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा युवा सेना हा प्रमुख अंग मानला जातो. नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेने, भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या धर्तीवर जनता दरबार आयोजित करावा. कारण, कोणावर टीका करणे सोपे असले, तरी जनतेच्या प्रश्नांना प्रत्यक्ष भिडून त्यावर तोडगा काढणे हे खरे नेतृत्व दर्शवते, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये आहे.
नवी मुंबई शहरात वाढते नागरीकरण, पायाभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत. कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराच्या माध्यमातून, नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्या सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच पद्धतीचा अवलंब करून युवा सेनेने नवी मुंबईत जनता दरबार आयोजित करावा, जेणेकरून तरुण कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
युवा सेना ही शिवसेनेची तरुण शक्ती आहे. त्यांनी फक्त राजकीय सभा किंवा टीका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जनता दरबार हा त्यासाठी उत्तम मार्ग ठरू शकतो, यामुळे युवा सेनेची जनमानसातील प्रतिमा अधिक सकारात्मक होईल.

