पालिका प्रशासन : ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना नेते नरेश म्हस्के आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात युवा सेनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
सदर बैठकीत नवी मुंबईत युवा सेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक, तसेच ‘युवा सेना आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी युवा सेनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना, तरुण युवा सैनिकांना निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच नियोजनबद्ध कामाला सुरुवात करण्याचे आवाहन केले. युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांनीही तरुणांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. या बैठकीतून युवा सेनेने नवी मुंबईतील आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले.

