पालिका प्रशासन/सुदिप घोलप : महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस, माजी आमदार तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी विविध माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांना सादर केले. यासोबतच, संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्याची विनंती त्यांनी केली.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील आणि प्रशांत सणस उपस्थित होते.
निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता:
– विविध माथाडी मंडळांची पुनर्रचना करणे.
– माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना संधी देणे.
– माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 3 संदर्भात नियमावलीसाठी शासनाचा जीआर जारी करणे.
– माथाडी कामगारांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करणे.
– प्रत्येक माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांची चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याकडून त्वरित सोडवणूक करणे.
– कामगार आणि मालकांच्या जबाबदाऱ्या तसेच चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या कर्तव्यांचे तत्परतेने पालन करणे.
– माथाडी कामगारांच्या मजुरी आणि लेव्ही वसुलीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावणे.
– पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळ, ग्रॉसरी लेबर बोर्ड, रेल्वे लेबर बोर्ड आणि कोल्हापूर माथाडी बोर्डातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करणे.
– लातूर आणि धाराशिव माथाडी मंडळाच्या चेअरमन यांनी योजनेतील कलम 33 चे उल्लंघन करून तुटपुंजी मजुरीवाढ केल्याबद्दल कारवाई करणे.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, कामगार मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही बैठक आयोजित झालेली नाही. यामुळे माथाडी कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे आता तरी तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी कामगार मंत्र्यांकडे केली.

