1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसच्या वारंवार घडणाऱ्या जळीतकांडाच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी परिवहन उपक्रमाच्या सर्व बसेसचे (स्ट्रक्चरल) इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल ऑडिट करण्याची लेखी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नुकतेच परिवहन उपक्रमाच्या तब्बल सात बसेस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या बसेसमध्ये आग लागणे ही गंभीर बाब असून, यामुळे चालक-वाहक आणि प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. या घटनांमुळे प्रवासी बसेसने प्रवास करण्यास टाळाटाळ करू लागले असून, परिवहन उपक्रमाच्या बसेसना “मृत्यूचा सापळा” संबोधले जाण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, असे सावंत यांनी निवेदनात नमूद केले.

सावंत यांनी नादुरुस्त बसेस रस्त्यावर चालविल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गळक्या बसेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अशा बसेसमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपघातामुळे चालक-वाहकांच्या कुटुंबियांचे पालनपोषण कोण करणार, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यामुळे नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सर्व बसेसचे तातडीने स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल ऑडिट करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सावंत यांनी आयुक्तांना केली आहे. नादुरुस्त बसेस दुरुस्त कराव्यात आणि वापरायोग्य नसलेल्या बसेस भंगारात काढाव्यात, असेही त्यांनी सुचवले. महापालिका सधन असल्याने आवश्यकता भासल्यास नवीन बसेस खरेदी कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. बस जळीतकांडाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिवहन व्यवस्थापकांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, भविष्यात अशा घटना घडून दुर्घटना झाल्यास परिवहन व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासनावर बसेसच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा दबाव वाढला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started