1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सन 2024-25 या वर्षासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यानुसार एकूण 527 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1965 च्या कलम 264, पोटकलम (1), (2), (3), आणि (4) अंतर्गत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचना परीक्षण) करणे बंधनकारक असल्याचे महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 265(अ) नुसार, ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत बांधकाम अभियंता किंवा संरचना अभियंत्याकडून करणे अनिवार्य आहे. इमारतीच्या वापराची 30 वर्षांची मुदत ही भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण किंवा अंशतः) मिळाल्याच्या तारखेपासून मोजली जाईल.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतर संरचना अभियंत्याने सुचवलेली दुरुस्तीची कामे पूर्ण करून, इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करणे आवश्यक आहे. हे ऑडिट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून अहवाल संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त, विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक (नगररचना) यांच्याकडे जमा करावा लागेल.

जर एखादी संस्था, मालक किंवा भोगवटादार यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास टाळाटाळ केली, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 398(अ) अंतर्गत ₹25,000/- किंवा इमारतीच्या वार्षिक मालमत्ता कराच्या रकमेपैकी जी रक्कम जास्त असेल, तितक्या रकमेचा दंड आकारला जाईल.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नोंदणीकृत संरचनात्मक परीक्षकांची (स्ट्रक्चरल इंजिनीअर्स) यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (www.nmmc.gov.in) उपलब्ध करून दिली आहे. इमारत मालक आणि संस्थांनी यादीतील अधिकृत अभियंत्यांकडूनच ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना धोकादायक इमारती किंवा घरांचा वापर तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. अशा इमारतींचा वापर सुरू ठेवल्यास जिवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालक, भोगवटादार किंवा संस्थेची राहील, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व इमारत मालक, भोगवटादार आणि गृहनिर्माण संस्थांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट निर्धारित मुदतीत पूर्ण करावे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत. यामुळे इमारतींची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि संभाव्य दुर्घटना टाळता येतील. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started