पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सीबीडी बेलापूर विभागातील सेक्टर १२ येथे नवीन पावसाळी जल उदंचन केंद्राच्या बांधकामाला, आज बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसमवेत या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, भाजपचे पदाधिकारी संजय ओबेराय, गायकवाड तसेच स्थानिक नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी सीबीडी मधील काही भाग अति मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले होते. याचे प्रमुख कारण या जल उदंचन केंद्राच्या रखडलेल्या कामकाजाला मानले गेले. न्यायालयाने मॅन्ग्रोज संदर्भात उशिराने दिलेली ना-हरकत मंजुरी आणि आयआयटीकडून उशिरा प्राप्त झालेल्या सूचनांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला. मात्र, काही राजकीय विरोधकांनी केवळ बेलापूर विधानसभेतच पाणी साचत असल्याचा खोटा प्रचार वृत्तमाध्यमांद्वारे केला होता. आजच्या दौऱ्यादरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या आरोपांचे खंडन केले.
आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, “जल उदंचन केंद्राच्या कामाला आता गती मिळाली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल. यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कमी होईल. विरोधकांनी केलेला खोटा प्रचार जनतेने नाकारला आहे.”
महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले की, सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला असून, लवकरात लवकर काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या दौऱ्याने बेलापूरमधील पाणी साचण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे.


