2–3 minutes

पालिका प्रशासन: कोपरखैरणे पोलीस ठाण्यात एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये १३ जणांनी संगनमत करून बिल्डर महेश मोतीराम कुंभार यांची तब्बल १२ कोटी ९ लाख ८५ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक स्वप्नील सुभाष बेडसे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

महेश कुंभार हे नवी मुंबईतील शहाबाज गावात राहणारे बिल्डर आणि डेव्हलपर आहेत. त्यांनी ‘ओमकार एंटरप्रायजेस’ या कंपनीच्या माध्यमातून अनेक बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत. २०१६ मध्ये त्यांची रियल इस्टेट एजंट ज्ञानेश्वर बाळकृष्ण बाळसराफ याच्याशी ओळख झाली. ज्ञानेश्वरने कुंभार यांच्या ‘ओम हेरिटेज’ इमारतीतील फ्लॅट्स विकण्याचे आणि त्यावर कमिशन घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर ज्ञानेश्वरने आपला मित्र मनिष दावडा आणि त्याची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर बाळसराफ यांच्यासह अन्य १० जणांची ओळख करून दिली. या सर्वांनी आपण मोठे व्यावसायिक असल्याचे सांगून कुंभार यांना त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

कशी झाली फसवणूक?

२०१७ मध्ये प्राजक्ता मकरंद पाटील यांनी कुभार यांच्याकडील सहा फ्लॅट्स खरेदी करण्याचे नाटक केले. यासाठी त्यांनी राज सिंगानिया यांच्या ‘भवानी एंटरप्रायजेस’च्या नावाने बनावट फर्म तयार केली. या फ्लॅट्ससाठी बँकेकडून कर्ज मंजूर करून ८१ लाख रुपये कुंभार यांच्या खात्यात जमा झाले. यापैकी ४५ लाख रुपये प्राजक्ता पाटील यांच्या सांगण्यावरून राज सिंगानिया यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले. प्राजक्ताने ही रक्कम तीन वर्षांत परत करण्याचे आणि ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत ही रक्कम परत करण्यात आली नाही.

यानंतर, ज्ञानेश्वर बाळसराफ आणि त्याच्या साथीदारांनी कुभार यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये आणि बनावट कंपन्यांमध्ये १२ कोटी ९ लाख ८५ हजार २०० रुपये हस्तांतरित करून घेतले. या कंपन्यांमध्ये एस.एस. फॅशन, श्री गणेश एंटरप्रायजेस, फ्लॅशझोन रिटेल, एमडीएसडी फॅशन हाऊस, नानका प्रोटीन प्रॉडक्ट्स, अॅमेझॉन, रुपोनी बँक, ई-टेक सोल्युशन्स आणि राधाकृष्ण असोसिएट्स यांचा समावेश आहे. या कंपन्या नावापुरत्या असून, त्यांचा कोणताही प्रत्यक्ष व्यवसाय नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

आरोपींनी दिल्या धमक्या

कुंभार यांनी आपली रक्कम परत मागितली असता, जागेश्वर बाळसराफ याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतर आरोपींनीही उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. यामुळे वैतागलेल्या कुंभार यांनी प्रथम सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने ही तक्रार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश दिले, त्यानुसार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपींची नावे

१. ज्ञानेश्वर बाळकृष्ण बाळसराफ, २. मनिष दावडा, ३. रत्ना ज्ञानेश्वर बाळसराफ ४. विनय दुबे, ५. मयूर शहा, ६. श्रुती मयूर शहा, ७. श्याम शिंदे, ८. अभिजित खरे, ९. विकास जैन, १०. प्राजक्ता मकरंद पाटील, ११. पौर्णिमा मोहन वायकर, १२. दिव्या पुरोहित, १३. मनोज दुबे  

तर, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३५१, ४०६, ४००, ४०९, ४१९, ४२०, ४२१, ४२२ अन्वये नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील बेडसे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून आणि खोटी आश्वासने देऊन ही फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांचा आणि बनावट कंपन्यांचा तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, महेश कुंभार यांनी आपली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी नागरिकांना अशा फसव्या योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started