1–2 minutes

पालिका प्रशासन (क्राईम रिपोर्ट) : जमीन खरेदीच्या नावाखाली नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील इन्फोटेक लँड्स कंपनीने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सौ. शीतल दिनकर गोत्राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीत एकूण 29 लाख 65 हजार रुपयांची आर्थिक हानी झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

शीतल गोत्राणे (वय 48, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 8 जुलै 2023 रोजी इन्फोटेक लँड्सच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्या. या जाहिरातीत सीबीडी बेलापूर येथील सुजित प्लाझा, सेक्टर 11 येथे स्वस्त दरात जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे नमूद होते. या जाहिरातीच्या आधारे शीतल यांनी त्यांचे पती दिनकर आणि मुलगा शशांक यांच्यासह 16 जुलै 2023 रोजी सुजित प्लाझा येथील इन्फोटेक लँड्सच्या कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांना कंपनीचे मालक किसन राठोड आणि त्यांचे कर्मचारी अनिल जाधव, संजना राठोड, कैलास दिंदे, संतोष ढाकणे, कोमल भिसे, कालचक, प्रतीक बई आणि अर्जुन जाधव यांनी जमीन खरेदीचे आमिष दाखवले.

शीतल आणि त्यांचे पती दिनकर यांनी 16 जुलै 2023 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत इन्फोटेक लँड्सच्या बँक खात्यांमध्ये आणि रोख स्वरूपात एकूण 11 लाख 60 हजार रुपये जमा केले. यामध्ये बँक ऑफ बडोदा, म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यांमध्ये फोन पे आणि रोखीने पैसे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, कंपनीकडून कोणतीही जमीन देण्यात आली नाही किंवा पैसे परत करण्यात आले नाहीत.

याशिवाय, शीतल यांच्या ओळखीच्या पुष्पा नामदेव सुयवंशी (वय 60, रा. अंधेरी, मुंबई) यांच्याकडून 10 लाख रुपये आणि देवराज मोतीराम जसवार (वय 44, रा. अंधेरी, मुंबई) यांच्याकडून 5 लाख 50 हजार रुपये, तसेच संजयकुमार विश्वकर्मा (रा. मानखुर्द) यांच्याकडून 2 लाख 55 हजार रुपये असे एकूण 29 लाख 65 हजार रुपये कंपनीने उकळल्याचा आरोप आहे. या फसवणुकीप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 3(5), 316(2) आणि 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदेश कोठावळे यांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

सीबीडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश रेवले यांनी नागरिकांना स्वस्त जमीन खरेदीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी कंपनीची विश्वासार्हता तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणात आणखी कोणी फसवणुकीला बळी पडले असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे. तर, या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started