पालिका प्रशासन/नवी मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील कन्नड हॉल येथे भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने भव्य “शोभायात्रा व महिला मेळावा” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नेतृत्व केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉ. राजेश पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रजाहितदक्ष शासन, महिला सबलीकरण, न्यायप्रियता, धर्माभिमान आणि सर्वसमावेशकतेच्या गुणांचा आदर्श आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताच्या निर्मितीत दिसत असल्याचे सांगितले. त्यांनी अहिल्यादेवींनी अन्नछत्रे, विहिरी, पाणपोई, धर्मशाळा आणि आश्रय शाळा यांसारख्या सामाजिक कार्यांद्वारे समाजाच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा गौरव केला. “अहिल्यादेवींचे नाव इतिहासात दानशूर, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
महिला मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना, अहिल्यादेवी होळकर अभियान संयोजिका वर्षाताई भोसले यांनी अहिल्यादेवींच्या विचारांनी प्रेरित होऊन समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सी. व्ही. रेड्डी, दुर्गा ढोक, सुषमा दंडे, विजया घरत, अंजली वाळुंज, मीना दरवेश, सायली शिंदे, घनश्याम मढवी, सुरेश शेट्टी, संपत शेवाळे, कल्पना शिंदे, कल्पना छत्रे, उज्वला जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
शोभा यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. हा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी वारशाला अभिवादन करणारा आणि महिला सशक्तीकरणाला चालना देणारा ठरला.



