पालिका प्रशासन/सुदिप घोलप : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जुईनगर विभागात उरलेले पक्षाचे एकमेव युवा माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेना(UBT)/महाविकास आघाडीची बेलापूर विधानसभेतील ताकद आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सदर माजी नगरसेवक गेल्या काही काळापासून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज होते. पक्षाकडून पुरेसे लक्ष न मिळणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक दुर्लक्ष आणि आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी आणि नाईक गटाशी त्यांच्या बैठका झाल्या असून, लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
हा माजी नगरसेवक जुईनगर विभागात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या पाठिशी स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे शिवसेना (UBT)/महाविकास आघाडीला जुईनगरसह बेलापूर विधानसभेतील राजकीय पकड कमकुवत होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात शिवसेना (UBT) च्या स्थानिक नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. दुसरीकडे, भाजपच्या नेत्यांनी या घडामोडींवर भाष्य करण्यास नकार दिला असला तरी, पक्षात नवीन चेहऱ्यांचे स्वागत करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा रणनीतीक डाव मानला जात आहे. या भागात शिवसेना(UBT)/महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात नेहमीच चुरस पाहायला मिळते. या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात कोणते नवे समीकरण उद्भवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘त्या’ नगरसेवकाच्या शिंदे गटातील संभाव्य प्रवेशाला गुरूचा तीव्र विरोध
प्राप्त माहितीनुसार, जुईनगर विभागातील या माजी नगरसेवकाला शिंदे गटात घेण्यासाठी काही नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यांचे राजकीय गुरू, जे स्वतः शिंदे गटात असून ते स्वतः माजी नगरसेवक आणि स्थानिक पातळीवर एक प्रभावी नेते आहेत, यांनी या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. सूत्रांच्या हवाल्याने, गुरूचा विरोध माजी नगरसेवकाच्या कार्यपद्धती, स्थानिक पातळीवरील वाद आणि शिंदे गटाच्या अंतर्गत गटबाजीला कारणीभूत ठरू शकणाऱ्या परिस्थितीमुळे आहे. गुरूने पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबाबत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी कळवल्याचे समजते.

