पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, पाणी गळती आणि पाणी चोरीला आळा घालण्यासाठी आठही विभाग कार्यालय निहाय उप अभियंता आणि परिमंडळनिहाय कार्यकारी अभियंता नेमण्याची गरज असल्याची मागणी नागरिक आणि तज्ज्ञांकडून जोर धरू लागली आहे.
नवी मुंबईत वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली असून, मोरवे जलवाहिनीसारख्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये वारंवार होणारी गळती आणि काही ठिकाणी पाणी चोरीमुळे पाणीपुरवठ्यावर ताण येत आहे. यामुळे अनेक भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
विभाग कार्यालय निहाय उप अभियंत्यांची नियुक्ती केल्यास प्रत्येक वॉर्डातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करणे, गळती दुरुस्त करणे आणि पाणी चोरी रोखणे शक्य होईल. तसेच, परिमंडळनिहाय कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीमुळे पाणीपुरवठ्याच्या मोठ्या प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होऊ शकेल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत सकारात्मक पावले उचलावीत आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी तातडीने अभियंत्यांच्या नियुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. तर, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी गळती किंवा चोरीच्या घटना आढळल्यास त्वरित महानगरपालिकेला कळवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे वारंवार करण्यात आले आहे.

