पालिका प्रशासन/प्रतिनिधी: नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी जमीन व्यवहारासंदर्भात शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत कर्जत पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर जाधव यांनी पोलिस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारीत भाजपच्या महिला मंत्री आ. मेघना बोर्डीकर-साकोरे आणि न्यायमूर्ती विकास बढे यांच्या पत्नी माधवी बढे या नावांचाही समावेश असून, या दोन मातब्बर महिलांना त्यांचा जवाब नोंदवण्यासाठी कर्जत पोलिसांनी नोटीस बजावली होती.
सूत्रांकडून प्राप्त व उपलब्ध माहितीनुसार,जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जमीन व्यवहारात त्यांना सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. यामुळे त्यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्याचवेळी विष प्राशन केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जाधव यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार झाले होते. या घटनेने नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
तक्रारीत एकूण १५ जणांची नावे नमूद करण्यात आली असून, त्यामध्ये एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याची पत्नी मंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे आणि एका न्यायमूर्तीच्या पत्नी माधवी बढे यांचा समावेश आहे. कर्जत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, तक्रारीत नमूद या दोन मातब्बर महिलांना जवाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, या दोघी कर्जत पोलिसांसमोर जवाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या की नाही, याबाबत माहिती उपलब्ध होवू शकली नाही.
या प्रकरणाने नवी मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. तक्रारीत नमूद उच्चपदस्थ व्यक्तींची नावे आणि त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई यामुळे हे प्रकरण आणखी संवेदनशील बनले आहे. पोलिस तपासातून नेमके सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

