पालिका प्रशासन/सुदिप घोलप : शहरातील निवासी आणि वाणिज्य सोसायट्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने पुनर्विकास प्रक्रिया राबवणाऱ्या सोसायटी कमिटीविरोधात कायदेशीर लढा देणाऱ्या रहिवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या रहिवाशांचा आरोप आहे की, कमिटी त्यांच्याविरोधात इतर गुन्हेगारी वृत्तीच्या सदस्यांकडून खोट्या तक्रारी करवून घेत असून, सोसायटीत वादविवाद निर्माण होईल अशा परिस्थिती जाणीवपूर्वक तयार करत आहे. यामुळे तक्रार करणाऱ्या सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटी कमिटीने पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता न बाळगल्याने काही सदस्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. मात्र, याचा राग आल्याने कमिटीने तक्रारकर्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. खोट्या तक्रारी, सामाजिक बहिष्कार आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण करून कमिटी या रहिवाशांना त्रास देत असल्याचा दावा केला जात आहे. “आम्ही फक्त आमचे हक्क मागत आहोत, पण कमिटी आम्हाला गुन्हेगारासारखे वागवत आहे. आमच्या कुटुंबियांसोबत धमक्याजन्य वर्तन केले जात आहे,” असे एका तक्रारकर्त्या रहिवाशाने सांगितले.
या प्रकरणामुळे सोसायटीतील वातावरण तणावपूर्ण बनले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक पोलिस स्टेशनने वेळीच मध्यस्थी करून हा वाद नियंत्रणात आणावा व सोडवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. “पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते,” असे एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत कारवाई केलेली नाही. मात्र, तक्रारकर्त्या रहिवाशांनी लवकरात लवकर गुन्हेगारी वृत्तीच्या विकृतीला ठेचण्यासाठी मध्यस्थीची मागणी केल्याने पोलिस प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

