1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन: उरण विधानसभा मतदारसंघातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निलगिरी गार्डन आष्टे आणि सभोवतालच्या रहिवाशी परिसरात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव सुरू असून, याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. सततच्या वीज खंडितमुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मते, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (MSEB) स्थानिक अभियंत्यांकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. केवळ व्यावसायिक आस्थापनांमधील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याचीच काळजी घेतली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या परिसरातील वीज पुरवठ्याची अनियमितता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

MSEBच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. स्थानिकांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत वीज पुरवठा नियमित होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started