पालिका प्रशासन/प्रतिनिधी : मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविल्या गेलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने अंतिम फेरीत निवडलेल्या 6 महानगरपालिकांचे मूल्यमापन करून ही मानांकने जाहीर केली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेबसाइट नूतनीकरण, AI चॅटबोट सुविधा, 68 लोकसेवा ऑनलाइन उपलब्धता, तक्रार निवारण प्रणाली, आणि कार्यालयीन स्वच्छता यासारख्या 10 मुद्यांवर उल्लेखनीय काम झाले. 2,766 निरुपयोगी वस्तू आणि 32 वाहनांचा लिलाव, 3 लाखांहून अधिक अभिलेखांचे वर्गीकरण, आणि 50,299 मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्यात आले.
नागरिकांच्या सोयीसाठी ‘माय NMMC’ ॲप, ई-ऑफिस प्रणाली, आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनात RFID तंत्रज्ञानाचा वापर आणि टाकाऊ कपड्याच्या पुनर्विकासाचा देशातील पहिला प्रयोग यामुळे NMMC चे विशेष कौतुक झाले. आयुक्त डॉ. शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन करत भविष्यात अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्धता दर्शवली.

