अनधिकृत बांधकामे, मार्जिनल स्पेसचा वापर बेकायदेशीरपणे जोरात
पालिका प्रशासन/प्रतिनिधी: नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि मार्जिनल स्पेसचा दुकानदारांकडून बेकायदेशीर वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तुर्भे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचे या प्रकरणाकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याचा आरोप काही जागृत नागरिकांनी केला आहे.
तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर कोणतीही तोडक कारवाई होत नाही. विशेष म्हणजे, वाशी विभागात कार्यरत असताना भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या तात्कालीन विभाग अधिकाऱ्याकडेच (सहाय्यक आयुक्त) तुर्भे विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे अनधिकृत बांधकामे आणि मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या दुकानदारांना आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पाठबळ मिळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंदन नावाचा कर्मचारी तुर्भे विभाग अधिकाऱ्यांसाठी ‘कलेक्टर’ म्हणून काम करत आहे. या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे, तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण आणि कायदेशीर कारवाई करावी; मार्जिनल स्पेसचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या दुकानदारांवर त्वरित कारवाई करावी; भ्रष्टाचाराच्या आरोपांखालील अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी आणि त्यांना कार्यभारातून मुक्त करावे; कुंदन नावाच्या कर्मचाऱ्याच्या ‘कलेक्टर’ भूमिकेची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तर, नागरिकांनी व्यक्त केलेली चिंता आणि तक्रारींची गंभीरता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षम आणि पारदर्शक कारभारावर नागरिकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.



