पालिका प्रशासन/नवी मुंबई : उलवे येथील एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात दुकानाच्या हेवी डिपॉझिटच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजेशकुमार प्रकाशचंद्र सुराणा, त्यांची पत्नी ललिता राजेशकुमार सुराणा आणि अयप्पन उर्फ आप्पा यांचा समावेश आहे. या तिघांनी मिळून तक्रारदार आरोफ आजमुद्दीन पटेल यांची १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार आरिफ पटेल (वय ४३) यांनी उलवे येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान शोधत असताना इस्टेट एजंट दशरथ बिडवई यांच्या माध्यमातून राजेश सुराणा आणि ललिता सुराणा यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी सेक्टर १९, ड्रीमम सॉलिटेयर को-ऑप. हौ. सोसायटीतील दुकान क्रमांक ०४ हेवी डिपॉझिटवर देण्याचे मान्य केले. त्यासाठी २५ जुलै २०२३ रोजी १० लाख रुपये डिपॉझिट देऊन २२ महिन्यांचा करार करण्यात आला. सदर रक्कम आरिफ आणि त्यांच्या पत्नी शबनम यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने सुराणा दाम्पत्याच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.
मात्र, काही कारणास्तव आरीफ यांनी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला आणि दुकान राजेंद्र राणे यांना भाडेतत्त्वावर दिले. परंतु, राणे यांचा व्यवसाय न चालल्याने त्यांनी व्यवसाय बंद केल्यानंतर दुकान रिकामे झाले. यावेळी दुकानाचे मूळ मालक राजेश सुराणा यांनी दुकानावरील प्रथम भाडेकरू आरिफ यांचे कुलूप तोडून स्वतःचे कुलूप लावले. यानंतर आरिफ यांनी डिपॉझिटची रक्कम परत मागितली, परंतु सुराणा दाम्पत्याने पैसे परत करण्यास नकार दिला आणि दुकानाचा ताबाही परत दिला नाही.
या प्रकरणात अयप्पन उर्फ आप्पा याने पैसे परत करण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, त्यानेही पैसे परत न करता आरिफ यांना मारहाणीची धमकी दिली आणि “तुझे पैसे परत करणार नाही, तुला काय करायचे आहे ते कर,” असे सांगितले. तक्रारदाराने चौकशी केली असता, सुराणा दाम्पत्याने मोहम्मदसाद खान यांची १५ लाख रुपये आणि संतोष गायकवाड यांची ११ लाख रुपयांची फसवणूक आगोदरच केल्याचे उघड झाले. यापैकी गायकवाड यांनी यापूर्वीच एन.आर.आय. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची तक्रार एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 420 (फसवणूक), 404 (अपहार), 406 (विश्वासघात) आणि 44 (सहआरोपी) अंतर्गत एप्रिल 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक हर्षद गणपत जुईकर यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.
आरीफ पटेल यांनी राजेश सुराणा, ललिता सुराणा आणि अयप्पन यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आपली आर्थिक हानीचा परतावा आणि दुकानाचा ताबा परत मिळावा, यासाठीची मागणी केली आहे. या प्रकरणाने उलवे परिसरात दुकान डिपॉझिटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांवर प्रकाश टाकला आहे.

