पालिका प्रशासन/नवी मुंबई : सीबीडी बेलापूर, सेक्टर 8 बी येथील अष्टविनायक को. ऑ. हाऊसिंग सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सीला विरोध करणाऱ्या सोसायटीच्या महिला सदस्य सुषमा महाडिक यांना मारहाणीचा प्रयत्न करून, शिवीगाळ व दमदाटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीचा सेक्रेटरी वासुदेव थोरबोले याच्याविरोधात सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रिडेव्हलपमेंट प्रकल्पाशी संबंधित प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (PMC) आणि स्थानिक राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण आले आहे.
अष्टविनायक सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पासाठी सोसायटीचा सेक्रेटरी वासुदेव थोरबोले याने आपल्या मनपसंतीची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी निवडण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, या निवडीला सोसायटीच्या काही सदस्यांनी, विशेषत: सुषमा महाडिक यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. सूत्रांनुसार, सुषमा महाडिक यांनी PMC निवडीच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि सेक्रेटरीच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे त्यांच्याविरोधात सोसायटीतील काही सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
तक्रारीनुसार, वासुदेव थोरबोले याच्या सांगण्यावरून सोसायटीतील काही महिलांनी सुषमा महाडिक यांच्यावर मारहाणीसाठी धावून गेले, त्यांना शिवीगाळ करून, दमदाटी करण्यात आली. यामुळे सुषमा यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून, त्यांनी तातडीने सीबीडी पोलीस स्टेशन गाठून वासुदेव थोरबोले याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे थोरबोले याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. मात्र, यामागे थोरबोले यांचा सुषमा यांना गंभीर इजा पोहोचवण्याचा किंवा त्यांचा जीव घेण्याचा हेतू होता का, असा प्रश्न स्थानिक रहिवाशांमध्ये उपस्थित होत आहे.
तर, या हल्ल्यामागे सेक्रेटरीच्या मनपसंतीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे PMC च्या मालकावरही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, या PMC चे स्लीपिंग मालक हे सीबीडीतील माजी नगरसेवक अशोक गुरखे यांचा जावई असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे पोलिस PMC मालकावर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. पोलिसांच्या या चालढकलीमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सीबीडी पोलीस स्टेशनकडून तपास सुरू असून, सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. मात्र, PMC मालकावर गुन्हा नोंदवण्याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांनी दिलेली नाही. यामुळे पोलिसांवरील दबाव वाढत आहे.
या घटनेने अष्टविनायक सोसायटीतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. रहिवाशांनी रिडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्व सदस्यांचा सहभाग असावा, अशी मागणी केली आहे. तसेच, PMC निवडीमागील संशयास्पद हेतू आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कथित हस्तक्षेपाची चौकशी व्हावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
सुषमा महाडिक यांनी फक्त सोसायटीच्या हितासाठी आणि पारदर्शकतेसाठी आवाज उठवला होता. पण त्यांच्यावर असा हल्ला करून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांनी सोसायटी सेक्रेटरी विरोधात विहित फौजदारी कारवाई करून, PMC मालक व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणाने नवी मुंबईतील सोसायटी रिडेव्हलपमेंट प्रकल्पांमधील राजकीय आणि आर्थिक हितसंबंध पुन्हा एकदा चर्चेत आणले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने करतात आणि PMC मालकावर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तूर्तास, अष्टविनायक सोसायटीतील तणाव आणि वाद कायम आहे.

