पालिका प्रशासन/प्रतिनिधी : ‘बापाची जनता पार्टी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या BJPत पुन्हा एकदा ‘जिल्हाध्यक्ष कोण?’ हा खेळ रंगला आहे. यंदा मात्र हा खेळ खेळणारे विद्यमान जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी नियमच बदलून टाकले, आणि स्वतःच्याच नावाची ‘हॅटट्रिक’ करण्याचा चंग बांधला आहे. गेली ८-९ वर्षे जिल्हाध्यक्षपदावर बसूनही पक्षसंघटना बांधण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या घरतांना आता पुन्हा एकदा ‘सिंहासन’ हवंय, पण यासाठी त्यांनी प्रदेशाकडून आलेल्या मानकांचा ‘मेकओव्हर’ केल्याचा आरोप होतोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, घरतांनी मतदार यादीत फक्त आपल्या ‘हितचिंतकांची’ नावं ठेवली. पण यातूनच गोंधळ उभा राहिलाय. माजी जिल्हा सरचिटणीस असा कुठलाच निकष नसताना चार नावं यादीत कशी काय आली? त्यातली दोन नावं संदीप नाईक यांच्या कार्यकाळातील, तर दोन त्याआधीची. आता हा काय प्रकार आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय. माजी जिल्हाध्यक्षांचा निकष असताना वर्षा भोसले, सिव्ही रेड्डी, भगवानराव ढाकणे यांच्यासारख्या दिग्गजांना यादीतून ‘हद्दपार’ का केलं? युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव २०१८-२२ च्या कार्यकाळातलं आहे, तर महिला मोर्चाची दोन नावं यादीत कशी काय घुसली?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर घरतांचा ‘पराक्रम’ सगळ्यांनीच पाहिला. स्वतःच्या वॉर्डातच भाजपाला पिछाडीवर टाकणाऱ्या घरतांनी बेलापूरच्या निवडणुकीत ‘निवांत’ राहणं पसंत केलं. तरीही त्यांची जिल्हाध्यक्षपदाची हाव काही कमी झालेली नाही. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, “आम्ही तर म्हणतो, घरतांनी आता थेट प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज करावा, म्हणजे किमान नवी मुंबईत तरी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल!”
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपात संघटनात्मक बदलांची प्रक्रिया स्पष्टपणे ठरवली गेली असताना, घरतांनी या प्रक्रियेला ‘स्वतःच्या सोयीनं’ वळवळ्याचं दिल्याचं दिसतंय. तर, कार्यकर्त्यांचा असा टोमणा आहे की, “घरतांनी यादी बनवताना नियमांचा विचार केला नाही, पण स्वतःच्या ‘नियमित’ सत्तेचा नक्कीच विचार केला!” आता या सगळ्या नाट्यात प्रदेश नेतृत्व काय भूमिका घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तोपर्यंत नवी मुंबईच्या भाजपात ‘बापाची जनता पार्टी’चा जलवा कायम राहणार, हे मात्र नक्की!

