1–2 minutes

पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेचे पावसाळापूर्व तयारीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नालेसफाई आणि गटार सफाईच्या कामात गंभीर हलगर्जीपणा दिसून येत आहे. प्रवाहातील अडथळे दूर करण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत असून, यामुळे पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग हा ढिम्म अधिकाऱ्यांचा ‘अड्डा’ बनला असल्याची टीका होत आहे. नालेसफाई आणि गटार सफाईच्या कामांचे वाटप करताना कॉन्ट्रॅक्टरांमध्ये वादविवाद होत असल्याचे समोर आले आहे. कामाचे वर्कऑर्डर देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याचा आरोप आहे. यामुळे सफाईच्या कामांना खीळ बसत असून, पावसाळ्यापूर्वी आवश्यक तयारी पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात रस्त्यांवर आणि कॉलन्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होते. “दरवर्षी नालेसफाईचे नाटक केले जाते, पण प्रत्यक्षात काम होत नाही. महापालिका फक्त कागदोपत्री आकडेवारी सादर करते,” अशी खंत नवी मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, गटारांमधील घाणीमुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोकाही वाढला आहे.

या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस पाऊल उचलले जात नाही. मात्र, सूत्रांनुसार, काही कॉन्ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंधांमुळे कामे रखडत असल्याचे बोलले जात आहे. तर, पावसाळा एका महिन्यावर आला असताना नालेसफाई आणि गटार सफाईच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. अन्यथा, यंदाही नवी मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started