पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण शाळेच्या बस ड्रायव्हरने केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस स्टेशनमध्ये बस ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी घडली. सदर विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर, सदरचा लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तातडीने शाळेच्या प्रिन्सिपलकडे तक्रार केली. मात्र, प्रिन्सिपलने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत बस ड्रायव्हरवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. यानंतर पालकांनी थेट एनआरआय पोलीस स्टेशन गाठून बस ड्रायव्हरविरोधात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी “लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा” (POCSO Act) अंतर्गत कलम ४,८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित बस ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, शाळा प्रशासनाच्या निष्काळजी वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पालकांनी शाळा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मुलांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

