पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबईतील सीबीडी येथील साई मंदिरात ट्रस्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मनमानी कारभार आणि देणगी रकमेच्या अफरातफरीच्या गंभीर आरोपांनी साई भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाकडे ट्रस्टींचे दुर्लक्ष, प्रसादाचा लंपास आणि दान रकमेचा लेखाजोखा सार्वजनिक न करण्याच्या प्रकारांमुळे शासनाने या मंदिरावर प्रशासक नियुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्थानिक साई भक्तांच्या मते, मंदिराचे ट्रस्टी आणि त्यांच्या कुटुंबीय मंदिराला स्वतःची जहागीर समजून वागत आहेत. ट्रस्टींचा मुलगा आणि एका बंगाली बाबा व त्याच्या कुटुंबियांने मंदिराच्या व्यवस्थापनावर पूर्णपणे ताबा मिळवला असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण दूषित होत आहे. मंदिराच्या ट्रस्टवर नवीन सदस्य नियुक्त करण्यास विद्यमान ट्रस्टींकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे, ज्यामुळे व्यवस्थापनात पारदर्शकता आणि सहभागाचा अभाव दिसून येतो.
मंदिरात साई भक्तांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपात दान जमा होते. मात्र, या दान रकमेचा आणि त्याच्या खर्चाचा कोणताही लेखाजोखा ट्रस्टींकडून सार्वजनिक केला जात नाही. वर्षानुवर्षे जमा होणाऱ्या रकमेचा गैरवापर होत असल्याचा संशय भक्तांनी व्यक्त केला आहे. “मंदिरात येणाऱ्या देणगीचा हिशेब भक्तांना मिळायला हवा. पण ट्रस्टींकडून याबाबत पूर्णपणे गुप्तता बाळगली जाते,” असे साईभक्ताने सांगितले.
तसेच मंदिरात दर गुरुवारी साई भक्तांना वाटण्यासाठी देण्यात येणारा प्रसाद हा बंगाली बाबा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून लंपास केला जात असल्याचा गंभीर आरोप आहे. भक्तांसाठी राखीव असलेला प्रसाद बंगाली बाबाच्या जवळच्या व्यक्तींना वाटला जातो किंवा गैरवापर केला जातो, ज्यामुळे भक्तांमध्ये नाराजी आहे. “प्रसाद हा भक्तांचा हक्क आहे, पण तो आमच्यापर्यंत पोहोचतच नाही,” अशी खंत एका भक्ताने व्यक्त केली.
मंदिरातील अनागोंदी कारभाराला आळा घालण्यासाठी शासनाने या मंदिरावर प्रशासक नियुक्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, मंदिरात जमा होणाऱ्या दान रकमेचे आणि त्याच्या खर्चाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची गरज असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. “शासनाने हस्तक्षेप करून मंदिराचे व्यवस्थापन सुधारावे आणि दान रकमेचा हिशेब पारदर्शकपणे जाहीर करावा,” अशी मागणी भक्तांनी लावून धरली आहे.
मंदिरातील एक प्रमुख ट्रस्टी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्याने पक्ष बदलत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक जाणकारांनी केला आहे. हा ट्रस्टी मंदिराचा वापर निवडणूक प्रचारासाठी करत असून, मंदिराला राजकीय व्यासपीठ बनवत आहे. मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे, पण ट्रस्टीच्या राजकीय खेळामुळे साई भक्तांचा विश्वास डळमळला आहे. यामुळे भक्तांची सातत्याने घटत आहे.
या सर्व आरोपांबाबत आणि मंदिरातील अनियमिततेबाबत स्थानिक प्रशासन काय कारवाई करते, याकडे साई भक्तांचे लक्ष लागले आहे. तर, साई मंदिरातील या गैरप्रकारांमुळे भक्तांच्या भावनांना ठेच पोहोचली असून, शासन लवकरात लवकर यावर कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

