पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या निष्क्रियतेमुळे लाखो रुपये खर्चून बांधलेले सिवूडस सेक्टर – 48 येथील डे-केअर सेंटर धूळ खात पडले आहे. याबाबत स्थानिक माजी नगरसेवक नागरिक विशाल डोळस यांनी आयुक्तांना पत्र लिहून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, येत्या आठवड्याभरात डे-केअर सेंटर सुरू न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
2015 आणि 2016 च्या महासभेत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा सर्व सुविधांनी युक्त डे-केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुंदर ईमारतही सिवूडस सेक्टर 48 याठिकाणी बांधण्यात आली. मात्र, समाज विकास विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने हे सेंटर आजही बंद आहे. याबाबत वारंवार तक्रारी आणि आंदोलने करूनही विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप विशाल डोळस यांनी केला आहे.
सूत्रांनुसार, समाज विकास विभाग या डे-केअर सेंटरची इमारत केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी वापरासाठी हस्तांतरित करण्याचा विचार महापालिका करत आहे. मात्र, असे केल्यास महासभेच्या निर्णयाचा अवमान होईल आणि ते बेकायदेशीर ठरेल, असा इशारा डोळस यांनी दिला आहे. त्यांनी आयुक्तांना येत्या आठवड्याभरात डे-केअर सेंटर स्थानिक नागरिकांसाठी सुरू करण्याची जाहिरात काढण्याची मागणी केली आहे. तसेच, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
डोळस यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नागरिक तीव्र आंदोलन करतील आणि महानगरपालिकेचे कामकाज ठप्प केले जाईल. यामुळे समाज विकास विभाग आणि महानगरपालिका प्रशासनावर दबाव वाढला आहे. तसेच, नागरिकांनीही या मुद्द्यावर संताप व्यक्त केला असून, लाखो रुपये खर्चून बांधलेली सुविधा धूळ खात पडणे हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे म्हटले आहे. आता आयुक्त या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

