पालिका प्रशासन/प्रतिनिधी : बेलापूर रेल्वे स्टेशनजवळील पेट्रोलपंप आणि ओरिजन रेस्टॉरंटसमोरील फुटपाथवर शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००५ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 123, 223, 274 आणि 275 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नाथ महादेव लोखंडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी भरत चांद्या वसावे (सह आयुक्त, कोकण विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. वसावे यांच्यासोबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती डी.एस. हरदास, पंच साक्षीदार योगेश दत्तात्रय पाटील (वय 47) आणि संभाजी महादेव जाधव (वय 55) तसेच सीबीडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघ उपस्थित होते.
पथकाने बेलापूर रेल्वे स्टेशनजवळील कन्व्हिनी पान शॉप येथे छापा टाकला. तेथे मगनलाल भोगजी पाटीदार (वय 42, रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट, शहाबाज गाव, सीबीडी बेलापूर) याच्याकडे 35 पाउच केसरयुक्त विमल पान मसाला (जंबो पॅक, किंमत 297.50 रुपये) आणि 35 पाउच वी-१ सुगंधित तंबाखू (किंमत 52.50 रुपये) आढळले. या प्रतिबंधित साठ्याची विक्री आणि साठवणूक महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी असल्याने पान शॉप सील करण्यात आले.
त्यानंतर, पथकाने ओरिजन रेस्टॉरंटसमोरील फुटपाथवर दुसऱ्या व्यक्तीची तपासणी केली. त्याने स्वत:चे नाव आमीर सेज्जुद्दीन अन्सारी (वय 24, रा. शहाबाज गाव, सीबीडी बेलापूर) असे सांगितले. त्याच्याकडे 12 पाउच केसरयुक्त विमल पान मसाला (मोठा पॅक, किंमत 564 रुपये), 18 पाउच विमल पान मसाला (किंग पॅक, किंमत 288 रुपये), 6 पाउच विमल पान मसाला (जंबो पॅक, किंमत 51 रुपये), आणि 40 पाउच वी-1 सुगंधित तंबाखू (किंमत 93 रुपये) आढळले. एकूण 144 पाउचेसचा हा साठा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत 1345 रुपये आहे. प्रत्येक पाउच तपासून त्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेला साठा विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सीबीडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्या ताब्यात देण्यात आले. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सदर प्रतिबंधित पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असून, त्यांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार आणि मृत्यू होऊ शकतो. आरोपींनी जाणीवपूर्वक असे पदार्थ विक्रीसाठी ठेवून लोकसेवकांच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे.
पोलीस ठाणे प्रभारी संदेश सादाशिव रेवले यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा साठवणूक आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी. तपासादरम्यान पुरवठादार आणि उत्पादकांपर्यंत पोहोचून या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वसावे यांनी सांगितले.

