पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबईतील वाढत्या नागरी समस्यांवर विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते मूग गिळून गप्प असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर विरोधी पक्ष कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामागे सत्ताधारी पक्षातील एका प्रभावशाली ‘दादा’ मंत्र्याचा दबदबा असून, ते विरोधी पक्षातील नेत्यांना नियंत्रित करत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे
नवी मुंबईतील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त आहेत. वाशी, ऐरोली, बेलापूर आणि खारघरसारख्या भागांत रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची टंचाई आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारण्याऐवजी मौन बाळगले आहे. विरोधी पक्षाचे नेते स्थानिक पातळीवर आंदोलने किंवा निवेदने देण्याचेही धाडस करत नाहीत, यामागे सत्ताधारी पक्षाच्या दबावाचे राजकारण असल्याचे राजकीय जानकरांचे मत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, सत्ताधारी पक्षातील एक प्रभावशाली मंत्री, ज्यांना स्थानिक पातळीवर ‘दादा’ म्हणून ओळखले जाते, विरोधी पक्षातील नेत्यांवर नियंत्रण ठेवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या मंत्र्यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय प्रभावाचा वापर करून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी ‘सौदा’ केला आहे. तर, विरोधी पक्षाचे काही नेते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी हातमिळवणी करत असल्याने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
नवी मुंबईतील नागरिकांनी विरोधी पक्षाच्या या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर, विरोधी पक्षाला जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही. ते फक्त निवडणुकीच्या वेळी दिसतात. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सामान्य नागरिकांचे मत बनले आहे.
नवी मुंबईतील नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षाने अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. सत्ताधारी पक्षातील प्रभावशाली नेत्यांचा दबदबा खरोखरच विरोधी पक्षाला नियंत्रित करत असेल, तर हे शहराच्या विकासासाठी घातक ठरू शकते. नागरिकांनीही एकजुटीने आपल्या मागण्या मांडून प्रशासनावर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत राजकीय पक्ष आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, तोपर्यंत नवी मुंबईतील समस्यांचे निराकरण होणे कठीण आहे.

