1–2 minutes

पालिका प्रशासन/नवी मुंबई : करावे गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून, ज्यासाठी १९ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामाचा “भव्य-दिव्य” भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे. विशेष म्हणजे, हा सोहळा जनतेच्या कररूपी पैशातून उभारल्या जाणाऱ्या या जलकुंभाच्या नावावर एक राजकीय नाट्य ठरला आहे, असं म्हणायला हरकत नाही!

सदर कामाचा शुभारंभ थेट पालघरचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्यासारख्या “प्रमुख मान्यवरां”ची उपस्थिती तर आहेच. पण खरी गंमत आहे ती या सोहळ्यामागची “गुपित” चर्चा… सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना जाणीवपूर्वक डावलून, इतर विधानसभेच्या आमदारांच्या हस्ते हा शुभारंभ होत आहे. आता याला राजकीय डावपेच म्हणायचं की निव्वळ अपमान, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे!

करावे गावातील जनतेच्या पैशातून बांधले जाणारे हे जलकुंभ आणि नवीन जलवाहिनीचे काम खरंतर गावकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असायला हवी. पण या सगळ्या गोष्टींचा शुभारंभ जर राजकीय सूडबुद्धी आणि दबावतंत्राचा भाग बनत असेल, तर ही पाण्याची टाकी खरंच किती “शुभ” ठरेल, याबाबत शंका आहे. जनतेच्या पैशावर उभारलेल्या प्रकल्पाचं श्रेय लाटण्यासाठी नेमके कोण किती पुढे जाणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

तूर्तास, करावे गावातील जनता पाण्याच्या टाकीच्या प्रतीक्षेत आहे, आणि राजकीय नेते? ते मात्र आपापल्या “टाक्या” भरण्याच्या तयारीत दिसत आहेत!


Design a site like this with WordPress.com
Get started