पंचतारांकित हॉटेल मध्ये दिवसभर मनपा अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा मनपा आयुक्तांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा – गजानन काळे
पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी नवी मुंबई मनपा तील ढिम्म अधिकारी यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतील कोर्ट यार्ड या पंचतारांकित हॉटेल मध्ये किमान १०० च्या वर अधिकाऱ्यांसाठी आज शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी दिवसभराची कार्यशाळा आयोजित केली आहे, याचा तीव्र निषेध मनसेच्या गजानन काळे यांनी नोंदवला आहे.
हॉटेल चा खर्च,जेवणाचा खर्च बहुदा अधिकारी यांच्या पगारातून जाणार आहे की मनपाच्या तिजोरीतून ??? असा खडा सवाल गजानन काळे यांनी यानिमित्ताने प्रशासनाला विचारला आहे. २५० करोड रुपये खर्च करून बनवण्यात आलेले मनपाचे मुख्यालय येथे ही मोठे सभागृह असताना सुद्धा मग पंचतारांकित हॉटेल मध्ये कार्यशाळेचा घाट का घातला गेला ?? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.नवी मुंबई मनपा मध्ये वेळेवर कंत्राटी कामगाराचे वेतन मिळत नाही … राज्य सरकारकडे बहिणींना द्यायला पैसे नाहीत … अशा वेळी मनपाने ही उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे … मनपा आयुक्त नेहमीप्रमाणे याचेही उत्तर देणार नाहीतच … मात्र आम्ही करदात्यांच्या पैशांचा हिशोब मागणार … मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय या आयुक्तांना आपणही जाब विचारणार आहात की नाही ?? असा प्रश्न यावेळी गजानन काळे यांनी उपस्थित केला. सर्व सामन्यांच्या सरकार मधे जनता उपाशी आणि अधिकारी तुपाशी अशी अवस्था झाली आहे अशी जळजळीत टीका यावेळी गजानन काळे यांनी केली.
नवी मुंबई मनपाच्या हलगर्जीपणामुळे आणि बेकायदेशीर रित्या काढण्यात आलेल्या सहलीमुळे एका मनपा शाळेतील मुलाचा मृत्यू झाला त्याला आर्थिक मदत द्यायला मात्र मनपा कडे पैसे नाहीत आणि तशी आयुक्तांची मानसिकता ही दिसत नाही .. ४० दिवस उलटून अजून सहल चौकशी समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही आहे … आता अशा कार्यशाळा घेवून अधिकारी कार्यक्षम होतील असा गोड गैरसमज आयुक्तांचा झालेला दिसतोय अशी बोचरी टीका देखील गजानन काळे यांनी याप्रसंगी केलेली आहे.

