1–2 minutes

पालिका प्रशासन/प्रतिनिधी : अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना आता अतिक्रमणकर्त्यांकडूनच सामाजिक बदनामी आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास पडत आहे. यासाठी अतिक्रमणकर्ते खोट्या पोलीस तक्रारींचा आधार घेत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, तक्रारदारांना न्याय मिळण्याऐवजी उलट त्यांच्यावरच दबाव वाढत आहे.

तर, अतिक्रमण करणारे व्यक्ती किंवा गट त्यांच्या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार झाल्यास, त्याचा सूड उगवण्यासाठी तक्रारदारांविरुद्ध खोटे आरोप लावतात. यामध्ये पैशांची मागणी, राजकीय धमकी अशा बनावट आरोपांचा समावेश असतो. अशा खोट्या तक्रारींदुळे पोलिसांवरही कारवाईचा दबाव येतो आणि तक्रारदारांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागते. याचा परिणाम म्हणून अनेकजण अतिक्रमणाविरुद्ध तक्रार करण्यास घाबरत आहेत.

एक पीडित व्यक्ती म्हणाले, “मी सार्वजनिक पायवाटेवर केलेल्या बांधकामांविरुद्ध महानगरपालिकेकडे तक्रार केली, पण त्यानंतर अतिक्रमणकर्त्यांनी आमच्यावरच पोलीस स्टेशनकडे खोटी तक्रार दाखल केली. आता मला पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागत आहेत.” अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

सुजाण नागरिक व कायदा तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी प्राथमिक तपासातच तक्रारींची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. “खोट्या तक्रारी दाखल करणे हा स्वतःच एक गुन्हा आहे” असे एका वरिष्ठ वकिलाने सांगितले.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तक्रारदारांचे संरक्षण करावे, ही काळजी गरज आहे. अन्यथा, अतिक्रमणकर्त्यांचा हा नवा खेळ सामाजिक सुव्यवस्थेला मोठा धोका ठरू शकतो, आणि तक्रादार तसेच त्यांच्या कुटुंबीय सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started