पालिका प्रशासन/नवी मुंबई : भारत रक्षा मंच आणि न्यूज मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी सेक्टर- 8 मध्ये श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर ‘श्रीराम दर्शन’ आणि ‘मोफत हेल्थ चेकअप कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण परिसर धार्मिक आणि सेवाभावी वातावरणाने भारलेला होता. तर, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक ऍड. शशिभूषण सिंग, कामगार नेते संजय पवार, समाजसेवक दिगंबर विचारे, युवा नेतृत्व मंदार घोलप, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश भगत, सक्षम महिला उद्योजक परिषदेच्या दिपाली घोलप, धनश्री फूडच्या धनश्री विचारे, जयश्री फाऊंडेशनचे वैभव जाधव इत्यादींचे मोलाचे योगदान लाभले.
श्रीराम नवमीच्या शुभदिनी आयोजित ‘श्रीराम दर्शन’ कार्यक्रमात भाविकांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि भजन-कीर्तनात तल्लीन झाले. यानंतर आयोजित केलेल्या ‘मोफत हेल्थ चेकअप कॅम्प’मध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, डोळे तपासणी, थायरॉड आणि कोलेस्ट्रॉल तपासणी, बीएमआय, आयुर्वेदिक तपासणी व मोफत औषधे वितरण, दंत तपासणी, फुफ्पूस तपासणी आणि सामान्य शारीरिक तपासणी यांसारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबद्दल बोलताना समन्वयक सुदिप घोलप म्हणाले, “श्रीराम नवमी हा एक पवित्र दिवस आहे आणि या दिवशी ‘श्रीराम दर्शन’ आणि ‘मोफत हेल्थ चेकअप कॅम्प’ आयोजित करण्याचा आमचा उद्देश नागरिकांना धार्मिक तसेच आरोग्यविषयक सेवा पुरवणे हा होता. नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे आणि या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या भारत रक्षा मंच आणि न्यूज मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो.” या कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक भावना आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर समन्वय दिसून आला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांचे आभार मानले.





