पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबईतील डोंगरांवर बेकायदेशीर झोपड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या झोपड्यांमुळे डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य तर धोक्यात आले आहेच, शिवाय सुरक्षा आणि आरोग्यविषयक समस्याही निर्माण झाल्या आहेत. या झोपड्यांकडे शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. तर, वाढत्या बेकायदेशीर झोपडपट्टीतून महापालिका, पोलीस, सिडको आणि वन विभाग असे चौघेही आपले हात लक्ष्मीच्या माध्यमातून धुवून घेत असल्याचेही वृत्त आहे.
नवी मुंबईतील ऐरोली, दिघा, घणसोली आणि सीबीडी बेलापूर यांसारख्या भागांतील डोंगरांवर बेकायदेशीर झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
स्थानिकांच्या मते, शासकीय यंत्रणा या बेकायदेशीर झोपड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे या झोपड्यांची संख्या वाढतच चालली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर या झोपड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या झोपड्यांमुळे होणारे धोके आणि समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे.
जर या बेकायदेशीर झोपड्यांवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर भविष्यात मोठे धोके निर्माण होऊ शकतात. डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल आणि सुरक्षा व आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होतील. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच, या झोपडपट्टी वासीयांचा पुनर्विकास करून त्यांना सरकारने किमान 2bhkचा नवा फ्लॅट बांधून देणे आवश्यक आहे.

