1–2 minutes

पालिका प्रशासन/नवी मुंबई : भारत रक्षा मंच (कोंकण प्रांत) यांच्या वतीने आयोजित गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा आज सीबीडी नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी, शोभायात्रा आयोजनचे मुख्य आधारस्तंभ राजेश भगत, दिगंबर विचारे, संजय पवार, मंदार घोलप, बिपीन तोमर, ऍड. अजिंक्य गव्हाणे, संजय ओबेरॉय, सलील गवळी, बंटी शिंदे इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

ढोल-ताशांच्या गजरात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मंचनासह शोभायात्रेने मार्गक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक पूजन करून भारत रक्षा मंच च्या राष्ट्रीय महिला संघटन मंत्री बिना गोगरी, शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, भारत रक्षा मंचचे कोकण प्रांत संघटन मंत्री पंकज तिवारी, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, सक्षम महिला उद्योजक परिषदच्या दिपाली घोलप इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत गुढी उभारण्यात आली. शोभायात्रेत शिवकालीन युद्ध साहित्यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक नृत्य आणि भगव्या ध्वजांनी सजलेली ही शोभायात्रा परिसरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. सहभागींमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता. याप्रसंगी, भाजपचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी सहभाग दर्शवला.

भारत रक्षा मंच (कोंकण प्रांत) चे मीडिया प्रकोष्ठ प्रमुख सुदिप घोलप यांनी सांगितले की, “हिंदू नववर्ष सण आणि संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्यासाठी ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही आनंदित आहोत.” शोभायात्रेदरम्यान स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शोभयात्रेची समाप्ती सीबीडीचा राजा श्री गणेश मंदिर याठिकाणी महाआरतीने झाली. तदनंतर, महाप्रसादाने शोभायात्रेची सांगता झाली. नवी मुंबई ऍम्ब्युलन्स यूनियनच्या रुग्णवाहिकेचे उदघाटन निलेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले, याप्रसंगी सदर युनिअनचे सचिव मुकुंद वाघमारे उपस्थित होते.

या शोभायात्रेने सीबीडीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आपली एकता आणि सांस्कृतिक अभिमान दाखवला. तसेच काही कारणास्तव लकी ड्रॉ येत्या ‘श्री राम नवमी’च्या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे शोभायात्रा नियोजन समितीकडून कळवण्यात आले.


Design a site like this with WordPress.com
Get started