पालिका प्रशासन/नवी मुंबई : सिडकोच्या लॉटरी योजनेतील घरांच्या वाढीव दरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि सिडको सोडतधारक यांनी एकत्र येऊन, आज शुक्रवार, २८ मार्च रोजी सकाळी 11 वाजता वाशी येथे ‘पोस्टकार्ड मोहीम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम वाशीतील पोस्ट ऑफिस, फायर ब्रिगेडच्या मागे, हिंदुराव पाटील मार्ग, जुहू नगर, सेक्टर-१६ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदार यांना पत्रे पाठवणार आहेत. या पत्रांद्वारे घरांचे वाढलेले दर कमी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सिडकोच्या लॉटरी योजनेत दरवाढीमुळे सोडतधारकांवर आर्थिक भार पडला असून, त्यांच्या नाराजीला आता आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
“ही दरवाढ सामान्य नागरिकांसाठी परवडणारी नाही. आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत,” असे एका सोडतधारकाने सांगितले. मनसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, सिडकोवर मध्यमवर्गीयांचे शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. “सिडकोने सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवायला हवे. आम्ही ही लढाई जोरकसपणे लढणार,” असे मनसे शहरध्यक्ष गजानन काळे यांनी मत मांडले आहे.
या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज सकाळी वाशीत मोठ्या संख्येने सोडतधारक आणि मनसे कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे. सिडको प्रशासनाकडून अद्याप या आंदोलनाबाबत किंवा दरकमीच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर आजच्या घटनाक्रमावरून पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

