1–2 minutes

‘भारत रक्षा मंच’तर्फे पनवेल महापालिकेला मागणी

पालिका प्रशासन/पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून खारघर सेक्टर- १४  याठिकाणच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्याचे, पनवेल महापालिकेमार्फत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून घेण्यात येणारे शुल्क तात्काळ रद्द करावे, तसेच सदर स्मशानभूमीची झालेली दुरावस्था सुधारावी अशी मागणी भारत रक्षा मंचतर्फे पनवेल महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

मृत्यू हे मानवी जीवनातील एकमेव सत्य असून, प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर प्रत्येक मनुष्याला स्मशानभूमी गाठणे आहे. कारण, याचठिकाणी हिंदू रितिरिवाजनुसार अंतिम संस्कार केले जातात. मात्र, पनवेल महापालिका संचलित खारघर नोड सेक्टर-१४ येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये मृत शरीर अंतीमसंस्कारासाठी आणल्यावर याठिकाणी मृतांच्या नातेवाईकांना हिंदू धर्मानुसार अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य व सेवा पुरविण्यासाठी पनवेल महापालिका शुल्क आकारते, ही बाब मृताच्या नातेवाईकांच्या दुःखात अधिक भर व अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी आणि निंदनीय ठरते. तसेच गॅसवाहिनीच्या माध्यमातून अंतिम संस्कारासाठीही महापालिका शुल्क आकारते.

तसेच या हिंदू स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीला अंत्यविधीसाठी घेवून येणारे, नातेवाईक व मित्रपरिवार यांना बसण्याची सुव्यस्थित बैठक व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नादुरुस्त असून, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसून,  सदर परिसर अस्वच्छ असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.

त्यामुळे वर नमूद हिंदू स्मशानभूमीमध्ये सर्वप्रकारच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व सेवा मोफत कराव्यात. तसेच स्मशानभूमीमधील बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सेवासुविधा दुरुस्त करून सुव्यस्थित कराव्यात. या सर्व मागण्या हे पत्र महापालिकेला प्रदान केल्यापासून, पुढील 20 दिवसांमध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा, 23 मार्च 2025 पासून “भारत रक्षा मंच” कोकण प्रांतचे सक्रिय सदस्य हिंदुधर्माभिमानी ‘जयेश गोगरी’ हे पनवेल महापालिकेच्या विरोधात मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण पुकारतील. ज्यासाठी पूर्णतः जबाबदार पनवेल महानगरपालिका असेल. असा उल्लेख भारत रक्षा मंच कोकण प्रांताचे मीडिया प्रकोष्ट प्रमुख तथा पत्रकार सुदिप घोलप यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started