प्रतिनिधी / पालिका प्रशासन : बेलापूर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे आणि राकाँपा शरद पवार गटाचे संदीप नाईक एकाच दिवशी आपआपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे, दोघेही मोठ्याप्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
नेरुळ येथील आगरी कोळी भवन याठिकाणी असणाऱ्या बेलापूर विधानसभा मध्यवर्ती निवडणूक आयोग कार्यलयात आज सोमवार २८ ऑक्टोबर रोजी गेली अनेक वर्षे पक्षाची शहराध्यक्षाची धुरा सांभाळणारे मनसेचे गजानन काळे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून गेली सव्वावर्षे जबाबदारी सांभाळणारे परंतु पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नुकतेच तुतारी हाती घेणारे संदीप नाईक एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी, हे दोघेही मोठ्याप्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असून, मोठ्यासंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कळते. संदीप नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकार्यकर्त्यांची साथ असेल. तर, मनसेच्या गजानन काळे यांकडे वर्षानुवर्षे कार्यरत पक्षाचे कट्टर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राज ठाकरे यांना मानणारे समर्थक – रहिवाशी असणार आहेत.

