प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधनासभेतील बहुतांश उमेदवार जनतेच्या प्रश्न समस्यांवर न बोलता “घराणेशाही, तुझा बाप व त्याचा मुलगा, वैफल्यग्रस्त नेता” अश्या मुद्द्यांवर निवडणूकीचा प्रचार नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य शासनाशी निगडित खोळंबलेली नागरी विकास कामे, समस्या ज्यामुळे जनतेला थेट दिलासा मिळेल यावर बोलणे सत्ताधारी व विरोधक दोघेही बोलायचे टाळत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
नवी मुंबईला प्रशस्त खाडी किनारा लाभला आहे, तरीही जलवाहतूक उपलब्ध नाही; पामबिच मार्गावर सानपाडा ते किल्ला जंक्शन आणि किल्ला जंक्शन ते मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग गरजेचा आहे; ऐरोली विधानसभेतील जनतेला अद्यापही मोरबे धरणाचा पाणीपुरवठा पाहिजे तसा मिळत नाही; वीजपुरवठा 24 तास अखंडित राहत नाही; MIDC मधील क्षेत्रातील श्रमिकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवून हक्काचे घर देणे आवश्यक आहे; ट्रस्टच्या नावाखाली कवडीमोल दराने शासकीय जमीन घेवून इमले उभारून खाजगी शिक्षण संस्थांकडून डोनेशनच्या नावाखाली होणारी पालकांची आर्थिक लुटीबाबत बोलणारा आमदार पाहिजे; अशाचप्रकारे खाजगी हॉस्पिटलमध्ये होणारी अनियंत्रित सिंडिकेट लूट यावर उमेदवार गप्प का?; दोन्ही विधनासभेत एकही पर्यटन स्थळ एवढी वर्षे विकसित करू शकले नाहीत; स्थानिक भूमीपुत्रांची गरजेपोटी घरे नियमित करू शकले नाहीत.; सिडको निर्मित कॉलनीतील घरे व दुकाने ‘फ्री होल्ड’ करू शकले नाहीत. सुपेरस्पेशालिस्ट शासकीय आरोग्य व्यवस्था नाही, उत्तम आणि शाश्वत शिक्षण संस्था नाहीत; नवी मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्षे कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगार – कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यापासून राज्य शासनाने वंचित ठेवले आहे; कंडोनियम अंतर्गतची कामे राज्य शासन महापालिकेला करू देत नाहीए; ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी संसाधने नाहीत; विनाआश्रित ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी घेणारी शासकीय वास्तू नाही.
तर, भावनिक आणि बिनबुडाच्या मुद्द्यांमध्ये जनतेला गुंफवून स्वतःच्या आमदारकीचा स्वार्थ साध्य करण्यासाठी माजी आमदार व काही संभाव्य आमदार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे, ज्याला नवी मुंबईत पुढील पाच वर्षांसाठी काम करायचे आहे, अश्यानी भावनिक मुद्दे बाजूला करून, जनतेला थेट दिलासा मिळेल अश्या मुद्द्यांवर कोणते दिवे लावले आणि लावणार आहेत. याबाबत भाष्य करावे, कारण घराणेशाही व त्यावर पोसली जाणारी बांडगुळे ही तर राजकारणाला लागलेली वाळवी आहे. जी लोकशाहीला आतून पोखरते व देशाला उध्वस्त करते. म्हणून, जनदिलासा विरहित मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत जनता सन्मानपूर्वक नारळ देण्याच्या तयारीत आहे, याचे भान प्रत्येक स्वार्थी आणि निस्वार्थी उमेदवाराने ठेवावे.

