प्रतिनिधी / पालिका प्रशासन : मराठा आरक्षण आंदोलनाच्या चळवळीतून उदयास आलेले संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम हे ऐरोली विधानसभेतून (१५०) परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याने, अंकुश कदम यांच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांना प्रस्थापितांच्या समोर सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
अंकुश कदम हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दुर्गम खेड्यातील एका सामान्य कष्टकरी मराठा कुटुंबातून येतात. उदरनिर्वाहासाठी संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, कदम यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून शाश्वत न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ते प्रदेश उपाध्यक्ष असल्याने कदम यांना राज्यातील प्रत्येक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाची स्थिती जवळून माहीत आहे.
ऐरोली विधानसभेत मोठ्याप्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील कष्टकरी वर्ग वास्तव्यास आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणांवर चालण्याचा निश्चय करत, समाजातील अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन छत्रपतींचे स्वराज्य ऐरोली विधानसभेत निर्माण करायचा ध्यास अंकुश कदम यांनी उराशी बांधला आहे. त्यामुळे, निस्वार्थी व्यक्तिमत्व नक्कीच ऐरोली विधानसभेतील जनता विधिमंडळात अंकुश कदम यांच्या रूपाने पाठवतील असा खंबीर आत्मविशास पक्षातील कार्यकर्त्यांना आहे.

