प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील दोघांपैकी एक जागा शिवसेना (शिंदे गटाला) सोडावी, अन्यथा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून थेट बंड करण्यात येईल. असा थेट ईशारा जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप वरिष्ठांना दिला आहे. तसेच, या मागणीचा प्रस्ताव आवाजी मताने पारितही करून घेतला.
आज (संध्याकाळी 15 ऑक्टो. रोजी) सानपाडा येथील वडार भवनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोली आणि बेलापूर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी, जर महायुतीच्या जागावाटपात (प्रस्ताव – 1) नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार घोषित केल्यास, मोठ्याप्रमाणात याठिकाणी बंडखोरी होईल असा ईशारा देण्यात आला आहे. तर, शिवसेनेला एक विधानसभा बिनशर्त सोडण्यात यावी आणि (प्रस्ताव – 2) नाईकांच्या परिवारात दोन्ही जागा दिल्यास, शिवसेनेकडून अपक्ष उमेदवारी भरण्यात येईल, असा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. तर, या मांडण्यात आलेल्या पहिल्या प्रस्तावाला सूचक म्हणून ऐरोली विधानसभा महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे व बेलापूर विधानसभा महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील यांनी अनुमोदन दिले. तर, दुसऱ्या प्रस्तावास चंद्रकांत आगोंडे हे सूचक व उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले.
या आढावा बैठकीत व्यासपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पाटकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी, रामाशेठ वाघमारे, रोहिदास पाटील, महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील, शहरप्रमुख विजय माने तर समोर प्रमुख पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


