प्रतिनिधी / पालिका प्रशासन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी, त्यांनी ‘ना महायुती, ना महाविकास आघाडी’मध्ये जाणार अशी घोषणाही केली आहे. तर पुन्हा एकदा मनसेच्या हाती राज्याची एकहाती सत्ता द्या, महाराष्ट्र विकासात्मक दृष्टीने सुतासारखा सरळ करेल, असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे यांनी यावेळी केले.
मनसेकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली जाणार असल्याने, त्याचे पडसाद नवी मुंबईतील दोन्ही विधानसभांवर पडणार आहेत. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्नेही विचारांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. तर, मनसेने बेलापूर विधानसभेवर आपले लक्ष केंद्रित केले असल्याने, शहराध्यक्ष गजानन काळे येथून उमेदवारी लढवणार आहेत.
आरोग्य, शिक्षण व बेरोजगारी असे थेट जनतेला भिडणारे मुद्दे घेऊन परिवर्तन यात्रा, परिवर्तन सभा घेणे, लहान मुलांना मोफत किल्ले दर्शन, ज्येष्ठ नागरिकांना मोफत नाटक प्रयोग दाखवणे, गणेशोत्सव आरस स्पर्धा आयोजित करणे व सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण करणे. इत्यादींमुळे, गजानन काळे यांना बेलापूर विधानसभेत मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तसेच, आता राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह येत्या दिवसांमध्ये पाहवयास मिळून, नवी मुंबईत विधानसभेत ‘तख्तापालट’ करण्याची शक्यता नाकारू शकत नाही.

