प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याचा फोटो सोशिअल मिडियावर व्हायरल झाला . आणि आ. मंदाताई म्हात्रे यांनी शिवसेनेच्या उबाठा गटात प्रवेश केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, व्हायरल फोटोमागचे सत्य काही औरच असल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुक 2019च्या रणधुमाळीत मंदाताई म्हात्रे यांना तिकीट देण्याचे जवळजवळ नाकारले असल्याचे वृत्त होते. परंतु, बेलापूरची जागा तत्कालीन महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सुटली होती. मात्र, मंदाताई म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. व बेलापूर विधानसभा भाजपला सोडवलीच सोबत स्वतःची उमेदवारीही नक्की केली होती. ज्याबाबत, आभार मानण्यासाठी मंदाताई ह्या उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटल्या होत्या. याच भेटीचा (2019 सालचा) फोटो आज रविवारी सकाळपासून सोशिअल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
तसेच, जर मंदाताई म्हात्रे शिवसेना उबाठा गटात प्रवेश करतात तर, त्या विजय नाहटा यांची महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवारी धोक्यात येईल आणि भाजपकडून इच्छुक संदीप नाईक यांना ही निवडणूक सोपी होईल. अशी चर्चाही नवी मुंबईतील राजकीय तज्ञांमध्ये सुरू होती. तर, उद्धव ठाकरे व आ. म्हात्रे यांच्यात सौहार्दाचे संबंध असल्याचे जगजाहीर आहेत, त्यामुळे मंदाताई शिवसेना उबाठा गटात भविष्यात प्रवेश केल्यास (तशी शक्यता कमीच आहे पण राजकारणात काहीही घडू शकते) त्यात आश्चर्यचकित होण्याचे असे काहीच नाही.

