नवी मुंबई/पालिका प्रशासन : शिंदेंसेनेला सोडचिट्ठी देवून तुतारी हाती घेण्याच्या विजय नाहटा यांच्या जलद निर्णयामुळे, महाविकास आघाडीतील ‘मशाल, पंजा आणि तुतारी’ पक्षातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपला पडद्यामागून मदत करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
बेलापूर विधानसभेतून महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मिळणार असून, त्यानुषंगाने नाहटा यांनी सदरहू पक्षात प्रवेश केला आहे. ज्यामुळे, या विधानसभेतून ‘अचानक’ इच्छुक झालेले व लोकसभेच्या निकालानंतर सक्रिय होवून हवाबाजी करणारे पदाधिकारी सर्वांत जास्त दुखावले असून, हेच स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाल्यापासून शरद पवार गटात कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्ते विजय नाहटा यांच्या प्रवेशामुळे आनंदित असून, बेलापूर विधनासभेत यावेळी तुतारी नक्कीच वाजणार असून, विजय नाहटा यांच्या रूपाने शरद पवार यांचे विचार मजबूत करणेसाठी एक आमदार विधिमंडळात दाखल होईल, असा त्यांना दृढ विश्वास आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वीच संधीसाधुपणे सक्रिय झालेल्या महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले रेटकार्ड घेवून व्हाईट हाऊसवर हजेरी लावण्यास सुरुवातही केली आहे.

